दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
सजवलेल्या बैलगाडीतून मजल दरमजल करत संगमनेर तालुक्यातील भाविक जेजुरीच्या दिशेने...
संगमनेर : 'चला जेजुरीला जाऊ, यळकोट यळकोट जय मल्हार,' असे म्हणत अनेक भाविक सजविलेल्या बैलगाडीतून जेजुरीच्या दिशेने निघाल्याचे चित्र संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पाहावयास मिळते आहे.दुसरीकडे खंडेरायाच्या जयजयगाराने महामार्ग दुमदुमून गेला होता.
काही दिवसांवर जेजुरीच्या खंडेरायाची यात्रा आली आहे. त्यामुळे राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी जात आहेत. नाशिकसह संगमनेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाविक जेजुरी व दावडीच्या खंडोबाला जात आहेत. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अनेक भाविक सजवलेल्या बैलगाडीतून जेजुरीच्या दिशेने जात आहेत. यावेळी बैलगाडीला कोपी सारखा गोल प्लास्टिक कागद बांधलेला, बैलांसाठी चारा आणि दोन ते तीन जण आत बसलेले असतात.
विशेष बाब म्हणजे बैलांनाही सजवलेले असते. बैलांच्या शिंगांना रंग, वर शेंबीला रंगीबेरंगी गोंडे, अंगावर झालर, गळ्यात घुंगरमाळा अशा पद्धतीने सजवलेले आहे. आमचे आजी-आजोबा जेजुरीला व दावडीच्या खंडोबाला जात होते. त्यामुळे ही परंपरा पहिल्यापासून चालत आली आहे. आता आम्ही गेल्या तीस वर्षांपासून खंडोबाच्या दर्शनाला जात असल्याचे भाऊसाहेब कारभारी रहाणे या भाविकाने सांगितले. जवळपास शंभरच्या वर बैलगाड्यांतून भाविक जेजुरीच्या दिशेने निघाले आहेत. ठिकठिकाणी या भाविकांचे ग्रामस्थ स्वागत करत आहेत.
नाशिक जिल्ह्यातून खंडोबाला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. तर दुसरीकडे चंदनापुरी, सावरगाव तळ, हिवरगाव पावसा, देवगाव या भागातील भाविक देखील मोठ्या प्रमाणात बैलगाडीतून दावडी व जेजुरीला जात आहेत. सध्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग जेजुरीसह दावडीला जाणाऱ्या भाविकांमुळे अक्षरशः दुमदुमून गेला आहे.
पूर्वी आमचे आजी-आजोबा जेजुरी व दावडीच्या खंडोबाला बैलगाडीतूनच जात होते. त्यामुळे ही परंपरा अशीच आम्ही पुढे चालू ठेवली आहे. जवळपास तीस ते चाळीस वर्षांपासून आम्हीही बैलगाडीतूनच खंडोबाला जात आहे. याचबरोबर मुलांप्रमाणेच बैलांची देखील चांगल्या पद्धतीने आम्ही काळजी घेत असतो, त्यांना चाराही बैलगाडीत असतो. ज्याठिकाणी विश्रांती घ्यायला थांबतो, तेव्हा त्यांना चारा घालत असतो, असे जेजुरीकडे निघालेल्या भाविकांनी सांगितले.