दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
थोरात कारखाना निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी १३३ इच्छुकांच्या अर्ज दाखल विरोधकांकडून उमेदवार दाखल न करण्याच्या निर्णयामुळे निवडणुकीची वाटचाल बिनविरोधकडे
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विरोधकांकडून तसेच सत्ताधाऱ्यांकडून फारशा हालचाली जाणवल्या नाही. त्यामुळे कारखाना निवडणूक एकतर्फी होण्याची तर काही जागा बिनविरोध देखील सुटण्याची चिन्हे आहे. या संदर्भात राज्यस्तरावरील नेत्यांमध्ये समन्वय झाल्याचे व पडद्यामागे मोठ्या प्रमाणात घडामोडी घडल्याचे बोलले जात आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसाखेर तब्बल १३३ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचा मोठा समावेश असून विरोधकांकडून फारसे उमेदवारी अर्ज दाखल झाले नाही.
विरोधी उमेदवार मैदानात नसल्याने आणि विरोधकांनी कारखान्याविरोधात समाज माध्यमातून निर्माण केलेले चित्र संपुष्टात आल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासाठी ही निवडणूक पुन्हा एकदा सोपी झाली आहे. कारखान्यावरील त्यांचे अधिपत्य कायम राहणार आहे. त्यामुळे कारखान्याची वाटचाल बिनविरोध निवडणुकीकडे असल्याच स्पष्ट होत आहे.
संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून कारखान्याचे निवडणूक लढविण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीकडून कोणतेही शक्ती प्रदर्शन न झाल्याने तसेच अपवाद वगळता महायुतीकडून इच्छुकांचे उमेदवारी अर्ज दिसत नसल्याने विरोधकांना उमेदवार देण्यात अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक की बिनविरोध निवडणुकीचे चित्र माघारी नंतर स्पष्ट होणार आहे.