संगमनेर नाशिक महामार्गावरील गणेश नगर कॉर्नर परिसरात रविवारी (दि. 17) सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका सेवानिवृत्त शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव आयशर वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडक इतकी भीषण होती की, संबंधित शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला.

 

सुधाकर भालेराव (वय 70, रा. संगमनेर कॉलेज परिसर, असे मृत शिक्षकांचे नाव आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास ते आपल्या पत्नीला बसस्थानकात सोडून दुचाकी क्रमांक एम एच 17 बी डब्ल्यू 9895 वरून घरी परतत होते. यावेळी गणेश नगर कॉर्नर येथील एका बँकेसमोर पाठीमागून आलेल्या आयशर वाहन क्रमांक एमएच 42 एक्यू 8004 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

 

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत सुधाकर भालेराव यांना तातडीने घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

 

या प्रकरणी शरद भालेराव (रा. डिग्रस) यांनी शहर पोलीसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत. भालेराव यांच्यावर डिग्रस येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे