संगमनेरः

 

आगामी गणेशोत्सव भव्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संगमनेर नगरपरिषद प्रशासनाने कंबर कसली असून, शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासोबतच गणेश मंडळांच्या अडचणी सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली, तसेच शहरातील विविध गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

 

गणेशोत्सवाच्या काळात शहरात नागरिकांची आणि भाविकांची मोठी वर्दळ असते. मात्र, सध्या शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे.

 

उत्सवा दरम्यान गणेशभक्तांना आणि मिरवणुकांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी डॉ. मैथिली तांबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन रस्त्यांच्या डागडुजीची आग्रही मागणी केली. सर्व कामे अत्यंत दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देत त्यांनी समस्त संगमनेरकरांच्या भावना आणि मागण्यांचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना सुपूर्द केले.

 

रस्त्यांच्या दुरुस्तीसोबतच उत्सवाचे नियोजन सुरळीत व्हावे यासाठी नगराध्यक्षांनी शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीत मंडप उभारणी, परवानग्या आणि उत्सवाच्या काळात येणाऱ्या इतर व्यावहारिक अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गणेश मंडळांना भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येवर तातडीने योग्य तोडगा काढला जाईल, असा विश्वास देत नगरपालिका प्रशासन मंडळांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 

गणेशोत्सव हा संगमनेर शहराच्या उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे. हा सण प्रत्येकासाठी आनंददायी आणि सुरक्षित राहावा यासाठी नगरपरिषद प्रशासन सर्व पातळीवर विशेष प्रयत्न करत असल्याचे सांगत, सर्व नागरी सुविधा वेळेत पूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.