संगमनेर ( प्रतिनिधी ) 

नेपाळमधील जलप्रलयाचे संकट, बंद झालेले रस्ते, बदललेला प्रवास आणि मनात सतत घोळणारी आपल्या माणसांची ओढ या साऱ्या भावनांना सोबत घेत नेपाळ दौऱ्यावर गेलेले संगमनेर, अकोले, नाशिक, पारनेर व पुणे परिसरातील ४५ पर्यटक अखेर सुखरूप मायभूमीत परतले. बुधवार, २ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास नाशिक रोडवर पोहोचताच आपण आपल्या प्रदेशात आलो! ही जाणीव होताच अनेकांचे डोळे पाणावले. त्यानंतर संगमनेरकडे सुरू झालेल्या परतीच्या प्रवासात प्रत्येकाच्या मनात आपल्या माणसांना भेटण्याची आतुरता होती. रात्री सव्वा अकरा साडे अकराची वेळ संगमनेरमध्ये पाऊल ठेवताच या सर्व प्रवाशांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

आपली माती, आपली माणसे सोडून परदेशात गेल्यानंतर अचानक ओढवलेले संकट किती अस्वस्थ करणारे असते, याचा अनुभव या प्रवाशांनी घेतला. नेपाळमधील जलप्रलयामुळे काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद झाले आणि नियोजित काठमांडू प्रवास रद्द करावा लागल्याचे प्रा हिरालाल पगडाल सांगत होते, साहित्यिक पगडाल म्हणाले संकटाच्या या काळात सहप्रवाशांनी एकमेकांना आधार देत आम्ही सगळ्यांनी एक कुटुंब’या भावनेने प्रवास पूर्ण केला. भरतपूर, चितवन, अयोध्या, प्रयागराज आणि वाराणसी असा बदललेला प्रवास करत अखेर मायभूमीच्या उंबरठ्यावर पाऊल पडले आणि मनावरील दडपण हलके झाले.

या टूरचे आयोजन निर्मला गुंजाळ यांनी केले होते. माजी मुख्याध्यापक विजय कोडूर, माजी मुख्याध्यापक केशवराव पळसकर, माजी उपप्राचार्य प्रल्हाद आरोटे, भारत सातपुते, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रेय हरिश्चंद्र नेहे, रवींद्र राऊत, मालपाणी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका मीनाक्षी पगडाल, प्रा. भानुदास चौधरी, ॲड. दिनकर पाटील यांच्यासह ४५ प्रवासी या समूहात होते.

या प्रवासात अडचणी आल्या परिस्थितीचा सामना केला , काठमांडूचा नियोजित बेत रद्द झाल्याची हुरहूर प्रत्येकाच्या मनात राहिली. २४ ऑगस्टला सुरू झालेला हा प्रवास अनेक अनपेक्षित वळणे घेत अखेर २ सप्टेंबरला संगमनेरच्या मातीत परतला. स्वागताच्या क्षणी अनेकांनी गळाभेट घेतली, कुणी मिठी मारली, तर कुणी डोळ्यांतील अश्रू पुसत आपले अनुभव सांगत असताना नेपाळ मधील संकट, बंद रस्ते आणि अस्वस्थ करणाऱ्या आठवणी मागे पडल्या होत्या, समोर होती फक्त आपल्या माणसांची भेट आणि मायेची ऊब.

 

 

संगमनेरच्या भूमीत परतल्यानंतर प्रत्येकाने जणू सुटकेचा नि:श्वास सोडला. काही क्षणांपूर्वीपर्यंत परक्या भूमीत सुरक्षित परतीची चिंता करणारे हेच चेहरे आता आपल्या गावच्या मातीचा गंध अनुभवत होते. त्यांच्या मनात एकच विचार असावा, हा एखाद्या चित्रपटातील प्रसंग नव्हता, स्वप्न नव्हते, आयुष्यात अचानक आलेला एक कटू अनुभव होता. आणि त्या अनुभवाच्या शेवटी मिळालेली आपल्या माणसांची मिठी. हाच त्यांच्या परतीच्या प्रवासाचा सर्वात हळवा आणि कायम स्मरणात राहणारा क्षण ठरला.