मुंबई : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्हावरून ठाकरे विरुद्ध शिंदे या प्रकरणाची सुनावणी आज होणार असल्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे सुप्रीम कोर्टामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.
शिंदे गटाच्या आमदाराला सुप्रीम कोर्टाने जोरदार झटका दिला आहे. त्यामुळे आता थेट आमदारकी धोक्यात आली आहे.
शिंदे गटाचे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाविरोधात आमदार खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (SLP) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अमोल खताळ यांची आमदारकी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आमदार अमोल खताळ यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका सुरुवातीलाच फेटाळून लावावी, अशी विनंती आमदार खताळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाकडे केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने खताळ यांची ही मागणी फेटाळून लावत त्यांच्याविरोधात रीतसर खटला चालवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.
खताळ यांनी हायकोर्टातील सुनावणीत आपण सध्या त्या फर्मचे भागीदार नसल्याचा आणि फर्म विसर्जित झाल्याचा दावा केला. मात्र, थोरात यांनी जीएसटी संकेतस्थळावरील नोंदी सादर करून फर्म सक्रिय असल्याचे दाखवले. न्यायालयाने या टप्प्यावर खताळ यांचा बचाव ग्राह्य धरता येणार नसल्याचे स्पष्ट केले
उच्च न्यायालयाच्या या दणक्यांनंतर आमदार अमोल खताळ यांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत खताळ यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात रीतसर सुनावणी आणि खटला चालणार असून, या कायदेशीर लढाईत खताळ यांची आमदारकी रद्द होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संगमनेरचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांचे वकील ॲड अमित कारंडे यांनी सांगितले की, संगमनेर विधानसभा मधील निवडणूक प्रतिज्ञापत्रात अमोल खताळ यांनी व्यावसायिक भागीदारी लपविली आहे, त्यामुळे त्यांची निवड रद्द करावी अशी याचिका हायकोर्टात केली आहे. या विरोधात अमोल खताळ यांनी विशेष अनुमती याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती मात्र सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली आहे. यापुढे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होईल. कोर्टाने सांगितले की एक रूपया जरी असेल तरी नियमानुसार कारवाई करावी लागेल. आता, आम्ही निवडणूक याचिका जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, त्यानंतर खताळ यांची निवडणूक रद्द होईल असे वकिलांनी सांगितले. या प्रकरणी सहा महिन्यांत यावर निकाल येणं अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले. नीलकमल भागीदारी संस्था आहे. त्याचा प्रोफेशनल टॅक्स भरला नव्हता. ५४ हजारांची थकबाकी बाकी आहे, ही माहिती खातल यांनी लपविली असल्याचे त्यांनी म्हटले.
संगमनेर मतदारसंघात झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला होता. चार दशकांहून अधिक काळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या थोरात यांना सुमारे १० हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. खताळ यांना १,११,४९५ मते मिळाली, तर थोरात यांना ९९,६४३ मते मिळाली होती.

