संगमनेर, प्रतिनिधी : संगमनेर शहरातील एका व्यावसायिक आस्थापनामध्ये कथितरित्या पाकिस्तानमध्ये उत्पादित करण्यात आलेल्या ‘गोरी’ ब्रँडच्या ब्युटी क्रीम विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती समोर आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी संबंधित उत्पादनांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच हे प्रकरण उघडकीस आणल्याबद्दल संगमनेर शहर पोलिसांचे विशेष अभिनंदनही त्यांनी केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, देशाच्या सुरक्षेशी, स्वाभिमानाशी आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही बाबतीत तडजोड केली जाणार नाही. कथितरित्या पाकिस्तानमध्ये उत्पादित करण्यात आलेल्या उत्पादनांची विक्री होत असल्याचा संशय अत्यंत गंभीर असून यामागील संपूर्ण साखळीचा तपास होणे आवश्यक आहे.

सदर ‘गोरी’ क्रीमबाबत विविध माध्यमांतून आणि तज्ज्ञांकडून वेळोवेळी आरोग्यविषयक गंभीर चिंता व्यक्त करण्यात आल्या आहेत. काही अहवालांनुसार अशा प्रकारच्या त्वचा गोरी करणाऱ्या उत्पादनांमध्ये घातक रसायने आढळण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचारोग, अॅलर्जी, त्वचेचे कायमस्वरूपी नुकसान तसेच दीर्घकाळ वापरामुळे मूत्रपिंड (किडनी) आणि इतर अवयवांवर दुष्परिणाम होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा उत्पादनांची विक्री होत असल्यास त्याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सूर्यवंशी म्हणाले की, संगमनेरसारख्या शहरामध्ये अशा संशयित उत्पादनांची विक्री होत असल्याची बाब चिंताजनक आहे. संबंधित उत्पादनांची आयात प्रक्रिया, विक्रीसाठी आवश्यक परवानग्या, गुणवत्ता प्रमाणपत्रे, वितरण साखळी आणि कायदेशीर बाबींची अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपासणी करावी. तसेच चौकशी अहवाल जनतेसमोर जाहीर करण्यात यावा.

यावेळी त्यांनी संगमनेर शहर पोलिसांचे अभिनंदन करताना सांगितले की, “सदर प्रकरण उघडकीस आणून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल संगमनेर शहर पोलिसांचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे. कायद्याची अंमलबजावणी आणि जनहिताचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी दाखविलेली तत्परता कौतुकास्पद आहे.”

शिवसेना शहर प्रमुखांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, “या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. प्रशासनाने वेळकाढूपणा केल्यास शिवसेना सर्व हिंदुत्ववादी संघटनांना सोबत घेऊन तीव्र लोकआंदोलन उभारेल. जनतेच्या आरोग्याशी आणि राष्ट्रीय हिताशी संबंधित प्रश्नांवर शिवसेना शांत बसणार नाही.”

संगमनेर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, कायद्याची अंमलबजावणी आणि जनहित लक्षात घेता प्रशासनाने तातडीने कारवाई करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.


या संदर्भात निवेदनाच्या प्रती मा. आमदार श्री. अमोलभाऊ खताळ पाटील, मा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई तसेच मा. पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर यांना माहितीस्तव व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचेही श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले.