संगमनेर (प्रतिनिधी) :
संगमनेर तालुक्यामध्ये सध्या अवैध दारूची सर्रास आणि उघडपणे विक्री सुरू असून, यामुळे तरुण पिढी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर लागली आहे. गावोगावी सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे गुन्हेगारीसह व्यसनाधीनता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या अत्यंत गंभीर परिस्थितीकडे पोलीस प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष अत्यंत चिंताजनक असून, तालुक्यातील सर्व अवैध दारू अड्डे तातडीने उद्ध्वस्त करून ते चालवणाऱ्यांवर 'मोक्का' सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे संगमनेर तालुका पश्चिम मंडल सरचिटणीस श्री साहेबराव वलवे यांनी श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात साहेबराव वलवे यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट ताशेरे ओढले आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावागावातील सामान्य नागरिकाला उघड्या
भाजप सरचिटणीस वलवे यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे मागणी
डोळ्यांनी दिसणारे अवैध दारूअड्डे केवळ पोलिसांनाच का दिसत नाहीत? असा थेट आणि रोखठोक सवाल वलवे यांनी उपस्थित केला आहे. पोलीस प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे आणि खाबुगिरीमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाडस वाढले असून, त्याचा फटका सामान्य जनता आणि तरुण पिढीला बसत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनातील सर्वात धक्कादायक आणि गंभीर बाब म्हणजे, स्वतः सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असूनही वलवे यांनी
प्रशासनाला आरसा दाखवला आहे. आम्ही सत्तेत असणारे पदाधिकारी आहोत, परंतु रस्त्याने ये-जा करताना आजूबाजूला चालणारे अवैध दारू अड्डे पाहून आम्हाला अक्षरशः लाज वाटत आहे. पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळे राज्यात राज्य करणाऱ्या महायुती सरकारची प्रचंड बदनामी होत आहे असा घणाघाती आरोप वलवे यांनी केला आहे. अवैध दारूच्या सुळसुळाटामुळे सामाजिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. निवेदनात सामाजिक व्यथा मांडताना
साहेबराव वलवे म्हणाले की, अजून ओठावर मिशीही न फुटलेली लहान मुले आणि तरुण वयातील मुले या अवैध दारूच्या जाळ्यात ओढली जात आहेत. म्हातारपणाची काठी बनणाऱ्या आपल्या तरण्याबांड मुलालाच खांदा देण्याची दुर्दैवी वेळ अनेक आई-वडिलांवर आली आहे. सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे गावात रोजची भांडणे, महिलांची छेडछाड आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, घरातील महिला व बालके असुरक्षित महसूस करत आहेत. संगमनेर तालुक्यातील हा अवैध दारूचा कलंक मिटवण्यासाठी पोलिसांनी केवळ नावाला किरकोळ कारवाया करून हात वर करू नयेत. तर हे अवैध धंदे चालवणारे मुख्य सूत्रधार आणि चालक यांच्यावर 'मोक्का' सारख्या कडक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी तुरुंगात करावी, अशी आग्रही मागणी संगमनेर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने श्री. वलवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

