दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर शहरातील नागरिकांना दोन महिन्यात पूल वाहतुकीसाठी खुला होणार
संगमनेर - गेल्या अनेक महीन्यापासून वादग्रस्त राहिलेल्या शहरातील म्हाळुंगी नदीवरील पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या दोन महिन्यात ह्या पुलाचे काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीच खुला होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनची संगमनेरकरांची गैरसोय दूर होणार आहे.
संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील पूल दोन वर्षा पुर्वी खचला होता. यामुळे साईनगर, ओहरा कॉलेज, पंपिंग स्टेशन, साई मंदिर, प्रवरा नदीवरील जाण्या येण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. हा पूल दुरुस्त करावा या मागणीसाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. संगमनेर नगरपालिका, सार्वजनिक बांधकामविभाग लोकप्रतिनिधी, आजी-माजी नगरसेवक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना साकडे घालून या फुलाचे काम मार्गी लावण्या संदर्भात मागणी केली होती. तात्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन देण्यात आले होते. नगरपालिकेवर मोर्चाही काढण्यात होता, मात्र त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत नागरिकांची हेळसांड केली,अपमानास्पद वागणुक दिली.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री राधाकृष्ण विखे या दोघांकडे या पुलाच्या कामात लक्ष घालण्याची मागणी केली होती. मात्र पुलाच्या कामाऐवजी राजकीय अस्तित्वात साठी दोघांनीही या पुलाच्या कामासंदर्भात अनेकदा पत्रक बाजी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. काम कोणी करायचे यावरून मोठे राजकारण झाले होते. मात्र भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना त्यावेळी साकडे घातले. नंतर विखे यांनी पुढाकार घेत निधी उपलब्ध दिला.
अनेक वादविवाद, राजकीय आरोप प्रत्यारोप, पत्रक बाजी नंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत या पुलाच्या कामाचे उद्घाटन झाले होते. दरम्यान नागरिकांची जाणे येण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी पालिकेने सिमेंट नळ्या टाकून दुसरीकडे तात्पुरता पूल उभारला. सध्या नागरिकांची याच पुलावरुन ये जा सुरू आहे. मात्र मोठया वाहनांची अडचण अद्यापही कायम असून मोठा पूल नसल्याने नागरिक नदीकडे येण्याचे टाळत आहे. या परिसरात संतोषी माता मंदिर, साई मंदिर, गजानन महाराज मंदिर, लक्ष्मी माता मंदिर, भवानी बाग, प्रवरा नदी सह इतर अनेक मंदीरे असुन सकाळी व सांयकाळी मोठी गर्दी होत असते.मात्र आता म्हाळुंगी नदीवरील पुलाचे काम जोमाने सुरू असल्याने लवकरच हा पुल वाहतुकीसाठी खुला होईल असा विश्वास नागरिकांत निर्माण झाला आहे.
कोट- संगमनेर शहरातील माळुंगी नदीच्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे. नगरपालिका या कामावर पूर्ण लक्ष ठेवून असून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुलाच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे येत्या दोन महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होईल.
रामदास कोकरे - मुख्याधिकारी संगमनेर नगरपालिका