संगमनेरमार्गे नाशिक-पुणे रेल्वेला रेड सिग्नल!
By Admin 2025-03-10
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेरमार्गे नाशिक-पुणे रेल्वेला रेड सिग्नल!
संगमनेर : राजकीय सत्तेचा संघर्ष किती टोकाला जाऊ शकतो, याची अनेक उदाहरणे आहेत. सध्याचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वादाचे असेच उदाहरण देता येऊ शकते.
आता याच वादाचा फटका एका महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाला बसणार असे दिसते.
नाशिक-पुणे हाय स्पीड रेल्वे प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यासाठी 30 टक्के जमिनीचे संपादन देखील झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भूमिपूजन आणि कामाला सुरुवात केव्हा होते, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. मात्र सध्या तरी ही उत्सुकता राजकीय वाद विवादामुळे शमण्याची चिन्हे आहेत.
हा रेल्वे मार्ग मूळ नाशिक-संगमनेर-चाकण-पुणे असा आहे. त्यासाठी विविध लोकप्रतिनिधींनी संघर्ष केला, सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे. त्यानंतर या प्रकल्पाला मंजूरी मिळाली. मात्र आता या प्रकल्पाला नगर जिल्ह्यातील माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय वादाची किनार आडवी आली आहे.
या प्रकल्पात काही सुधारणा म्हणून शिर्डी आणि अहिल्यानगरचा समावेश करण्यात येईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी कुमार यांनी नुकतेच सांगितले केले. त्यामुळे या प्रकल्पाला राजकीय अडथळा निर्माण केला जात असल्याचा संदेश गेला आहे. नाशिक- पुणे रेल्वे मार्गात संगमनेर हे अपरिहार्यपणे येते. शिर्डी बाजूला राहते. शिर्डीमार्गे हा प्रकल्प गेल्यास रेल्वे मार्गाचे अंतर वाढणार आहे. परिणामी हा प्रकल्प लांबण्याची चिन्हे आहेत.