दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
18 वर्षांची परंपरा असलेला सांस्कृतिक उपक्रम
संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू अशी ओळख असलेला दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम गुरुवारी दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6 वाजता भंडारी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्रीताई थोरात आणि वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी केले आहे.
दीपावली पहाट गाणी या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे सांस्कृतिक दृष्ट्या वैभव संपन्न असून मागील अठरा वर्षांपासून सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
डॉ.संतोष खेडलेकर यांची संकल्पना, निर्मिती आणि निवेदन असलेल्या या कार्यक्रमात यावर्षी सुवर्णमहोत्सवी सिनेमे ही संकल्पना घेऊन १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमातील गाजलेली गाणी सादर होणार आहेत. सुप्रसिध्द संगीत संयोजक सत्यजित सराफ यांच्या संगीत दिग्दर्शनात इंडियन आयडॉल फेम सुरभी कुलकर्णी, विकास भालेराव, अनुजा सराफ आणि सौरभ गुंजाळ हे गाण्यांचे सादरीकरण करणार आहेत.
संगमनेर इतिहास संशोधन मंडळ आणि संगमनेर वाचन कट्टा यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या कार्यक्रमाला माजीमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला रसिक संगमनेरकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक धनश्री कैलास सोमाणी, द्वारकानाथ राठी, डॉ. अरविंद रसाळ, प्रदीपभाई शाह तसेच कार्यक्रमाचे समन्वयक देवीदास गोरे यांनी केले आहे.