दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याला तीन पुरस्कार
अहिल्यानगर दि.२६- जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (मशीन लर्निंग) वापर करणाऱ्या उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. २०२३-२४ च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उल्लेखनीय कार्याला पुरस्कृत करण्यात आले असून राज्यातील प्रथम क्रमांकाचा १० लक्ष रुपयांचा पुरस्कार अतिरिक्त जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना जाहीर झाला आहे. २०२४-२५ साठी शासकीय अधिकाऱ्यांमध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले, तर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये राहाता येथील मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांनाही प्रत्येकी ५० हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांना यापुढच्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अहिल्यानगर जिल्हा राज्यात अनेक क्षेत्रात अग्रेसर असून त्यामागे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रयत्न आहेत. जाहीर झालेल्या पुरस्काराने जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली असून या पुरस्कारामुळे इतरांनाही चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात विविध प्रकारचे अभिनव आणि लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी कामकाजात संगणकीय प्रणालीच्या उपयोगावर भर दिला. जिल्हा प्रशासनाने गौणखनिज, ई रेकॉर्डस, इक्युजे कोर्ट प्रणाली, ई ऑफीस, 'जलदूत' पाणी टंचाई व्यवस्थापन, भुसंपादन यासारख्या अनेक उपक्रमांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्यांना पारदर्शक, गतिमान पद्धतीने सेवा देण्यावर भर देण्यात आला.
अवैधरित्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (मशीन लर्निंग) वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे अवैध वाहतुकीला आळा घालण्यात येत आहे. कुठलेही मनुष्यबळ न वापरता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अवैध गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा ई-पंचनामा महाखनिज प्रणालीद्वारे करण्यात येऊन नोटीस व दंडाच्या आदेशाची प्रक्रिया संपुर्णपणे ऑनलाईन करण्यात येते. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जिल्ह्याला ‘गोल्ड स्कॉच’ पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.
गौण खनिज विभागामार्फत नागरिकांना तात्पुरता परवाना, नवीन खाणपट्टा अर्ज, खाणपट्टा नूतनीकरण अर्ज, गौणखनिज विक्रेता परवाना यासारखे अनेक दाखले महाखनिज प्रणालीद्वारे नागरिकांना एका क्लिकवर मिळणे शक्य होत आहे. गौण खनिज उत्खनन व वाहतूक देखरेखीसाठी महाखनिज ॲप तसेच गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांसाठी महाखनिज ट्रक ॲपची सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ई सुविधांमुळे नागरिक व व्यावसायिकांना गौणखनिज विभागासोबत काम करणे अधिक सुलभ झाले आहे.