दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
जल जीवन योजनेच्या साठवण तलावातील गौण खनिजाच्या वाहतुकीकडे डोळेझाक.
संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील जल जीवन योजनेचे काम अद्यापही अपूर्णच आहे. मात्र पाणी साठवण्यासाठी खोदल्या जाणाऱ्या साठवण तलावातील कोट्यावधी रुपयाच्या माती व मुरमाची वाहतूक सुरू आहे . यामुळे सध्या ग्रामपंचायत व महसूल विभागातील अंतर्गत संघर्षामुळे या योजनेचे काम पूर्ण होणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संगमनेर शहरा नजिक असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी २०२२ साली जलजीवन योजना राबविण्यात आली. या योजनेसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या योजनेचे कामही सुरू झाले. मात्र ग्रामपंचायत, ठेकेदार व जलजीवन प्राधिकरणाचे अधिकाऱ्यात वेळोवेळी शाब्दिक बाचाबाचीने हे काम रेंगाळले. मुदत संपुनही गेल्या तीन वर्षापासून या योजनेचे काम रखडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी घुलेवाडीकरांना वणवण करावी लागते.पाच ते सहा दिवसांनी नळाला पाणी येत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे.
मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायतीने जलजीवन योजना राबवली. ग्रामपंचायत हद्दीतील भेंडाळी धरण येथे साडेसोळा एकरात तलाव खोदण्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. या साठवण तलावाच्या कामातून मोठ्या प्रमाणावर माती व मुरूम काढला जात आहे. यामुळे ग्रामपंचायतीने हा माती व मुरूम गावातील रस्त्यांसाठी वापरण्याची परवानगी तहसीलदारांकडे मागितली होती. मात्र यावर महसूल विभागाचा अधिकार असल्याने सदर माती व मुरूम वापरू शकत नाही असा आदेश तहसीलदारांनी दिला. यामुळे दोन वर्षापासून साठवण तलावातील गौन खनिजाची होणाऱ्या वाहतुकीबाबत ग्रामपंचायत अनभिज्ञ आहे. महसूल विभागाकडेही भरलेली रॉयल्टी व उचललेल्या गौणखणीची आकडेवारीची अधिक माहिती मिळू शकली नाही. यामुळे सध्या साठवण तलावातील गौणखणीज वाहतूकीच्या प्रश्नावर नायब तहसिलदार, तलाठी व सरपंच या सर्वांनीच मौन धारण केल्याने चर्चेचा विषय झाला आहे.
कोट- या गौण खनिज कामाबाबत ग्रामपंचयातचा काही संबंध नाही. महसूल विभागाकडून रॉयल्टी भरून घेण्यात आली आहे.या बाबत अधिक माहिती जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडे आहे.