दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
सायखिंडी फाटा येथे अपघातग्रस्त कारमध्ये आढळले गोमांस
संगमनेर (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील सायखिंडी
फाट्याजवळ नाशिक-पुणे महामार्गाच्याकडेला पलटी झालेल्या कारमध्ये गोमांस आढळल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सायखिंडी फाट्याजवळ एक पांढऱ्या रंगाची कार (क्र.एमएच.४९ एई. २२००) अपघात होवून पलटी झालेली आहे. त्यामध्ये गोमांस असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना समजली होती. त्यावरून त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकातील पोहेकॉ. बडे, पोकॉ. हरिश्चंद्र बांडे, विशाल कर्पे, दाभाडे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता गाडीमध्ये काळ्या कागदात गोमांस आढळून आले. याबाबत तेथे थांबलेल्या इसमांना सदर गाडी कोणाची आहे? असे विचारले असता एक इसम पुढे येऊन म्हणाला, ही गाडी माझी आहे. तेव्हा त्यास नाव विचारले असता कैफ लियाकत शेख (वय १९, रा. रहेमतनगर, ता. संगमनेर) असे असल्याचे सांगितले. या कारवाईमध्ये पथकाने पंचनामा करून ८ लाख रुपये किमतीची कार व गोमांस असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोकों. हरिश्चंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैफ शेख याच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.