लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी डॉक्टर अमोल कर्पे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी     |      ५० हजाराच्या लाच प्रकरणात पत्रकार आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात     |      महाविद्यालयातील तरुणीवर अत्याचार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल     |      संगमनेर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी राजेश मालपाणी तर व्हा.चेअरमनपदी मधुसूदन नावंदर यांची एकमताने निवड     |      हनुमान जयंती उत्सवात धुडगूस घालणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एक अल्पवयीन     |      जवळेकडलग - वडगाव लांडगा रस्ता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच     |     
५० हजाराच्या लाच प्रकरणात पत्रकार आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात By Admin 2025-04-18

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




५० हजाराच्या लाच प्रकरणात पत्रकार आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील तलाठी अक्षय ढोबळे आणि खासगी व्यक्ती पत्रकार रमजान नजीर शेख हे ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत.

 या प्रकाराने संगमनेरमध्ये खळबळ उडाली असून एसीबीच्या जाळ्यात सापडलेला शेख नेमका कशाचा पत्रकार आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.

खडी वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराच्या गाड्यांवर कारवाई न करण्यासाठी आणि ती सुरळीत चालू ठेवण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७अ व १२ प्रमाणे घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या नाशिक युनिटने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा ट्रकद्वारे खडी वाहतूक करण्याचा व्यवसाय आहे. त्यांची वाहतूक सुरळीत सुरू राहावी आणि त्यांच्या ट्रकवर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी आरोपी रमजान नजीर शेख (वय २८, व्यवसाय पत्रकारिता व शेती, रा. मांडवे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याने तलाठी अक्षय ढोबळे यांच्या सांगण्यावरून १६ एप्रिल २०२५ रोजी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने यानंतर तलाठी अक्षय ढोबळे यांची रमजान शेख याच्या समक्ष भेट व खडी ट्रक वाहतुकीबाबत चर्चा केली. त्यावर तक्रारदाराने दोघांना ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यांनी आपल्या खडी वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई करू नये आणि ती सुरळीत चालू ठेवावी, अशी विनंती केली. यावर तलाठी अक्षय ढोबळे यांनी पैसे स्वीकारण्याची तयारी दर्शवली, परंतु या बदल्यात गाड्या फक्त दोन महिनेच चालतील, असे सांगितले. योजनेनुसार, १६ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८:३९ वाजता मांडवे येथील मारुती मंदिरासमोर आरोपी पत्रकार रमजान नजीर शेख याने पंच साक्षीदारांच्या समक्ष तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारण्याबाबत रमजान शेख याने तलाठी अक्षय ढोबळे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली आणि काय करावे, असे विचारले. त्यावर ढोबळे यांनी ‘ठीक आहे, उद्या बघू’ असे म्हणून लाच घेण्यास संमती दर्शवली. या सापळा कारवाईत एसीबीच्या पथकाने आरोपी रमजान शेख याला ताब्यात घेतले आहे. तर, तलाठी अक्षय ढोबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. ही यशस्वी सापळा कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील पवार, पोलीस नाईक योगेश साळवे आणि पोलीस नाईक परशुराम जाधव यांच्या पथकाने पार पाडली.