दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
फूस लावून पळविलेल्या विद्यार्थीनीवर वारंवार अत्याचार ! संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना; मुलासह अख्ख्या कुटुंबाविरोधात गुन्हा..
संगमनेर :- शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थीनीला फूस लावून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेवून तिच्यावर वारंवार अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सतत सुरु असलेल्या या प्रकाराला विरोध करणाऱ्या पीडितेला पळवून नेणाऱ्या मुलासह त्याची आई, भाऊ, बहिण व मित्रांनी मारहाण व धमक्या देत तब्बल तीन महिने तिला डांबून ठेवले. या काळात पीडितेने वारंवार घरी पाठवण्याची आणि आईशी फोनवर बोलण्याची विनंती करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर पीडितेने बारामतीत असताना सोबतच असलेल्या आपल्या शैक्षणिक लॅपटॉपचा वापर करुन भावाशी संपर्क केल्यानंतर तिची सुटका झाली. या प्रकरणी पीडितेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वरील आठजणांवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी तालुक्यातील तळेगाव दिघे येथील रहिवाशी असून गुन्हा दाखल होताच ते पसार झाले आहेत.
याबाबत 19 वर्षीय पीडित विद्यार्थीनीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तळेगाव दिघे येथे राहणाऱ्या अक्षय नानासाहेब दिघे याच्याशी असलेल्या ओळखीतून त्याने गेल्यावर्षी 11 नोव्हेंबररोजी सकाळी दहाच्या सुमारास पीडितेला तिच्या कॉलेजमधून फूस लावून पळवून म्हसवड (जि.सातारा) येथे नेले. त्यावेळी या दोघांसाठी आधीच व्यवस्था करणाऱ्या
गणेश बनसोडे याने पीडितेला 'तुझ्या कारणावरुन जर तुझ्या कुटुंबातील लोकांनी अक्षयला काही त्रास दिला तर, मी संगमनेरला जावून तुझ्या भावाचा मुडदा पाडील..' अशी धमकी भरली. त्यामुळे पीडित विद्यार्थीनी घाबरुन गेली. त्यानंतर आठ दिवस ते दोघेही म्हसवडमध्येच बनसोडेच्या मदतीने थांबले. या दरम्यान पीडितेच्या कुटुंबाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली असल्याने त्याच्या तपासाचे ओघळ अक्षय दिघेच्या घरापर्यंत पोहोचले. त्यामुळे आरोपीची आई लता नानासाहेब दिघे हिने 19 नोव्हेंबररोजी दोघांसह संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले.
मात्र पीडित विद्यार्थीनीला त्यापूर्वीच कुटुंबाला मारुन टाकण्याच्या धमक्या दिल्या गेल्याने त्यांच्या काळजीने तिने आपणास अक्षय दिघेसोबतच रहायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी पीडितेच्या इच्छेनुसार पुढील कारवाई करीत हरवल्याचा शोध बंद केला. या प्रकारानंतर आरोपीने पीडितेला त्याच्या मूळगावी न नेता तो पुन्हा तिला म्हसवडला घेवून गेला व काही दिवस तेथे काढल्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीला तिला घेवून मध्यप्रदेशमधील नागलवाडीत पोहोचला. तेथेही त्याचा मित्र अमित बाळासाहेब जगदाळे (रा. बारामती) याने सर्व व्यवस्था करुन ठेवली होती. अक्षय दिघे पीडितेला फोनवरुन कोणाशीही संपर्क करु देत नव्हता, त्यासाठी तो प्रत्येक क्षण तिच्यासोबतच वावरायचा. मध्यप्रदेशात असताना त्याला कोठे जायचे असल्यास तो खोलीला बाहेरुन कुलुप लावून जायचा.
अडीच महिन्यांच्या तेथील वास्तव्यात अक्षय दिघे याने जवळजवळ दररोजच तिच्यावर तिचा विरोध डावलून शारीरिक अत्याचार केले. त्याला वैतागलेल्या पीडितेने घरी जाण्याचा तगादा लावल्याने आरोपीने आपल्या मित्रासह तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत धमक्या भरल्या. या कालावधीत आरोपीचा भाऊ रवींद्र नानासाहेब दिघे व मित्र किरण भाऊसाहेब शेवकर हे दोघेही वेळोवेळी मध्यप्रदेशमध्ये येवून आरोपीला आर्थिक मदत करायचे व जाताजाता पीडितेला कुटुंब संपवण्याच्या धमक्या भरुन लाथाबुक्क्यांनी मारहाणही करायचे. या उपरांतही पीडितेने आराडाओरड करीत घरी जाण्याचा आग्रह सुरुच ठेवल्याने अखेर मध्यप्रदेशातील दोघा अनोळखी इसमांच्या मदतीने आरोपीने पीडितेच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून तिला मध्यप्रदेशातून बारामती येथे आणले. प्रवासात आरोपीची आई लता दिघे, बहिण सोनीली वाकचौरेही सोबत होती. या दरम्यान पीडितेने बारामतीत पोहोचल्यावर काही बोलू नये यासाठी आरोपीच्या आई व बहिणीने बळजबरीने तिला कोणतेतरी औषध पाजले.
बारामतीत कल्याण लक्ष्मण तावरे या अन्य एका आरोपीच्या घरात तिला डांबून ठेवण्यात आले. या दरम्यान कल्याण तावरे व अमित जगदाळे दोघेही वेळोवेळी तिला ठेवलेल्या खोलीत जावून तिला वाईट शिवीगाळ करीत, चापटीने मारहाण करीत वारंवार तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत.
हा सगळा प्रकार सुरु असताना पीडितेने एक दिवस संधी साधून आपल्या शैक्षणिक लॅपटॉपमधून आपल्या कुटुंबाशी संपर्क साधला व घडत असलेला प्रकार सांगत लवकरात लवकर आपली सुटका करण्याची विनवणी करीत ती रडू लागली. आपली मुलगी संकटात असल्याचे पाहून तिचे आजोबा, आई, भाऊ आणि इतर मंडळींनी गेल्या महिन्यात 28 मार्चरोजी बारामती (जि.पुणे) येथे धाव घेत पीडितेने सांगितलेल्या पत्त्यावरुन तिची सुटका केली.
जवळपास तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या या भयानक प्रकाराने दहशतीत वावरलेली ती विद्यार्थीनी आपल्या कुटुंबाला पाहून भेदरली. त्यातून सावरण्यात तिला आठवड्याचा कालावधी गेल्यानंतर मंगळवारी (ता.15) तिने आपल्या आईसह शहर पोलीस ठाण्यात येवून वरील आठजणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तालुक्यातील तळेगाव दिघे येथील रहिवाशी असलेल्या या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल होताच ते पसार झाले असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.