दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
जिम सप्लीमेंटच्या दुकानात तरुणाईला 'नशेची इंजेक्शन ' लाखोंच्या मुद्देमाल जप्त
अबब... संगमनेर आता 'ड्रग्स'च्या विळख्यात! जिम सप्लिमेंटच्या दुकानातून तरुणाईला 'नशेची इंजेक्शन्स', लाखोंचा मुद्देमाल जप्त; धोकादायक अवैध धंद्याची नव्याने भर... पोलीस कारवाईत २.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त
ड्रग विक्रीमुळे संगमनेर शहराच्या सुसंस्कृतपणाला बट्टा लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. संगमनेरकरांनी याप्रकरणी वेळीच सावधान होण्याची गरज आहे, अशाप्रकारे जर कोणी नशा करत असेल तर या संदर्भातील माहिती पोलिसांना कळविणे सुद्धा आवश्यक आहे, अन्यथा संगमनेरची ओळख उध्वस्त होऊन जाईल.
संगमनेर शहर पोलिसांनी सोमवारी (२७ऑक्टोबर) दुपारी ही कारवाई केली आहे. नगरपालिकेच्या रस्त्यावर, लाल बहादूर शास्त्री चौकातील 'एम. आर. व्हिटॅमिन सप्लिमेन्ट शॉप'मध्ये एका इसमाकडून नशेसाठी वापरले जाणारे SULPHATE INJECTION IP TERMIVA' हे औषध अवैधरित्या विकले जात आहे, अशी गोपनीय माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या माध्यमातून ही कारवाई केली.संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर त्यांनी एका व्यक्तीला 'डमी ग्राहक' बनवून सोमवारी दुपारी सव्वा तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान औषध खरेदी करण्यासाठी दुकानात पाठवले. आणि कारवाईसाठी सापळा लावला. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी लागणारे हे इंजेक्शन विनापरवाना विक्री करत असल्याचे आढळून आल्याने या कारवाईत पोलिसांनी आदित्य किशोर गुप्ता या तरुणाला ताब्यात घेतले.त्याची झडती घेतली असता दुकानाच्या टेबलावर ६, ६००/- किमतीच्या
'MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP TERMIVA 10 ML' च्या ०३ बॉटल्स आणि ०९ इंजेक्शन सिरींजसह एकूण २,२३,१२०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये एक अॅपल कंपनीचा मोबाईल फोन आणि एका यामाहा कंपनीच्या मोटारसायकलचा (MH.15.HP.6646) समावेश आहे. याप्रकरणी आरोपी आदित्य गुप्ता याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १२३, १२५ आणि २७८ नुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजकीय हस्तक्षेप – सदर प्रकरणात
आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधित महायुतीच्या पदाधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे बोलले जात आहे, याप्रकरणी गुन्हा दाखल करू नये म्हणून राजकीय हस्तक्षेप झाला, मात्र पोलिसांनी खमकी भूमिका दाखविल्याने अखेरीस गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली मात्र याप्रकरणी एफआयआर रात्री सव्वा नऊ वाजता दाखल झाली. या विषयात पोलिसांवर मोठा राजकीय दबाव आला होता, कलमे कमी करण्याच्या अनुषंगाने सुद्धा हस्तक्षेप करण्यात आला असल्याची चर्चा सुरू होती.