दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन
संगमनेर प्रतिनिधी शिवसेनेचे माजी उप जिल्हाप्रमुख, ज्येष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवक कैलास उर्फ आप्पासाहेब केसेकर यांचे काल शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
राजकारण म्हणजे पदांची बेरीज नव्हे, तर विचारांची मशाल असते, हे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला शिकवले. त्या मशालीला अखेरपर्यंत जपणारा, कोणत्याही सत्तासमीकरणांपुढे न झुकणारा आणि निष्ठेची किंमत शब्दांत नव्हे तर कृतीत मोजणारा शिवसैनिक म्हणजे कैलास उर्फ आप्पासाहेब केसेकर. आज तो कट्टर शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेला आहे; आणि संगमनेरच्या चौकातील ते शांत, संयमी ओंकारेश्वर हॉटेल निशब्द झाले.शिवसेना म्हणजे बाळासाहेबांचा आवाज, आणि शिवसैनिक म्हणजे त्या आवाजातून संघर्षाचे रणशिंग फुंकणारे सैनिक .
आप्पासाहेब केसेकर हे त्या रणशिंगातील एक खडे सूर होते. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता, कोणत्याही सत्तेच्या दारात न वाकता त्यांनी शिवसेनेचा भगवा डोईवर नव्हे, तर रक्तात मिरवला. आंदोलन असो, मोर्चा असो वा संघटन बांधणी शिवसेनेच्या प्रत्येक कठीण टप्प्यावर आप्पासाहेब पुढे उभे राहिले.