दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
दहशतीचा नमुना संगमनेरकरांनी पाहिला
संगमनेर (प्रतिनिधी)--जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणारे राज्याचे मंत्री नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून काढावा या मागणीचे अत्यंत लोकशाही मार्गाने निवेदन देणारे छात्र भारतीचे कार्यकर्ते अनिकेत घुले यांना मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेऊन जोरदार मारहाण केली यावेळी मंत्री विखे, संगमनेर चे नवीन आमदार यांचे सर्व समर्थक उपस्थित होते. दहशतीचा नमुना संगमनेरकरांनी पाहिला आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे हे संगमनेर नगरपालिका येथे बैठकीसाठी आले असताना संगमनेर छात्र भारतीच्या वतीने निवेदन देण्यासाठी अनिकेत घुले व इतर विद्यार्थी हे पुढे सरसावली. अत्यंत नम्रपणे ते आपली मागणी मांडत होते.
मात्र भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अनिकेत घुले व त्याच्या सहकाऱ्यांना मंत्री राधाकृष्ण विखे व संगमनेरचे लोकप्रतिनिधी अमोल खताळ यांच्यासमोर गचांडी धरून जोरदार मारहाण केली. हे सर्व घडत असताना संगमनेर मधील सर्व महायुतीचे म्हणून घेणारे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. विशेष म्हणजे मंत्री विखे व अमोल खताळ हे सर्व पाहत होते परंतु त्यांनी कोणत्याही भाजपाच्या व शिवसेना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना अडवले नाही.
विद्यार्थ्यांवर होणारा हा हल्ला अत्यंत निंदाजनक होता. हे वृत्त समजतात संगमनेर तालुक्यामध्ये अत्यंत संतापाची लाट निर्माण झाली. यानंतर अनिकेत घुले व त्याचे सर्व सहकारी पोलीस स्टेशनमध्ये भाजपाच्या या गुंडाविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेले मात्र प्रशासनाने राजकीय दबावामुळे टाळाटाळ केली यावर त्यांनी ठिय्या मांडला.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो व व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून नावानिशी तक्रार दाखल करावी अशी मागणी छात्र भारती संघटनेने केली आहे. हे सर्व पदाधिकारी मंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे समर्थक अमोल खताळ यांच्याबरोबर दिवसभर शासकीय अधिकाऱ्यांसमवेत फिरत आहे. विशेष म्हणजे पोलीस प्रशासन त्यांचे संरक्षण करत आहे हा कुठला न्याय आहे अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची तीव्र प्रतिक्रिया अनिकेत घुले यांनी व्यक्त केली आहे.
चौकट
संगमनेर मध्ये संतापाची लाट
प्रत्यक्ष मंत्री व त्यांचा समर्थक आमदार संगमनेर मध्ये उपस्थित असताना भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना जोरदार मारहाण केली. हे अत्यंत निंदनीय असून याचे फोटो व्हिडिओ संगमनेर तालुक्यात व्हायरल झाल्याने संगमनेर मधील पोलीस प्रशासन कायदा व्यवस्था याबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला असून अशी दडपशाही संगमनेर मध्ये कधीही नव्हती हे नव्याने काय सुरू आहे असा प्रश्न सर्वत्र विचारला जात असून विद्यार्थी व तरुणांमध्ये भाजप महायुती व सत्ताधाऱ्यांविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.