दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
मशाल उत्सव हा महाराजांच्या तेजस्वी स्वराज्याची आठवण करून देणारा - डॉ.जयश्रीताई थोरात
संगमनेर ( प्रतिनिधी ) शहाजीराजे भोसले यांनी स्थापन केलेल्या शहागडाला मोठे ऐतिहासिक महत्व असून दीपावलीनिमित्त शंभूराजे परिवाराच्या वतीने होणारा मशाल महोत्सव हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या तेजाची आठवण करून देणारा ठरत असल्याचे गौरव उद्गार कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी काढले आहे.
पेमगिरी येथे आई पेमाई देवीच्या गोंधळा निमित्ताने छत्रपती शंभुराजे परिवाराच्या वतीने आयोजित मशाल महोत्सवाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अनिकेत मंडलिक, सुनील ठाकरे, संदेश वाळुंज, विश्वा जाधव, राहुल राजपूत,धीरज कदम, प्रगती डोंगरे,धनश्री शेवाळे, प्रसाद मंडलिक, सतीश कोल्हे,स्वप्निल कोल्हे,सुकन्या तांदळे,गणेश अवताडे,मंगेश गुंजाळ, विष्णू दुबे, मीनानाथ शेळके, अक्षय दुबे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पेमाई देवीच्या गोंधळा निमित्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तर शहागडावर मोठ्या आनंदाने मशाल महोत्सव आयोजित केला. यावेळी गावातील व परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
अंधाऱ्या रात्री लखलखणारा मशाल महोत्सव हा संस्मरणीय ठरला.यावेळी शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने पेमगिरी येथील मुलींना मैदानी व साहसी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले याचे प्रात्यक्षिकही करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ.थोरात म्हणाल्या की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा आहे. महाराजांनी सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. कधीही जातीभेद केला नाही. मानवता हाच धर्म मानला. संतांनी ही हेच सांगितले याच विचाराने आपण काम करत आहे. माणूस म्हणून एकमेकांचा आदर करा. जातीभेदाच्या नावावर फूट पाडणारी मंडळी समाजामध्ये सध्या खूप आहे.परंतु त्यांचे अतिरेकी राजकारण जनतेला आवडत नाही.
संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो.त्यांनी गावोगावी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. तालुका आपला परिवार म्हणून प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी राहिले आहेत. दिवाळी हे आनंदाचे पर्व आहे. वर्षभर आपण काम करतो आणि या काळामध्ये सर्वांनी आनंद साजरा करायचा असतो. माता पेमाईचा सर्वांना आशीर्वाद असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांचा वारसा घेऊन संगमनेर तालुक्यात युवकांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.