संगमनेरात अर्ध्याहून अधिक बेकायदेशीर रिक्षा नागरिकांच्या जीवाला धोका
By Admin 2025-03-28
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेरात अर्ध्याहून अधिक बेकायदेशीर रिक्षा
नागरिकांच्या जीवाला धोका
संगमनेर : संगमनेर शहर
व परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या अर्ध्याहून अधिक रिक्षा बेकायदेशीर आहेत. अनेक रिक्षा मुदतबाह्य असून, त्यांची स्थिती खराब असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे; मात्र पोलीस आणि आरटीओ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
संगमनेर शहरात रोज शेकडो रिक्षा प्रवासी वाहतूक करतात. शहरात ३०० हून अधिक रिक्षा विविध गल्ल्यांमधून प्रवासी सेवा देत आहेत. बस स्थानक परिसर, नवीन नगर रोड, अकोले रोड, चावडी, अशोक चौक, भारत चौक, गंवडीपुरा, नेहरू चौक, रंगारगल्ली, स्वातंत्र्य चौक, हॉटेल काश्मीर समोर अशा विविध ठिकाणी रिक्षा थांबे आहेत. येथे मोठ्या संख्येने रिक्षा उभ्या असतात व त्याद्वारे हजारो नागरिक प्रवास करतात.
शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक रिक्षांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. त्यातील अनेक रिक्षा मुदतबाह्य असूनही खुलेआम रस्त्यावर धावत आहेत. यातील अनेक रिक्षा नादुरुस्त असूनही त्या गर्दीतून
प्रवाशांची वाहतूक करत असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. आरटीओ प्रशासन आणि पोलिसांनी शहरातील सर्व रिक्षांची तपासणी करून बेकायदेशीर रिक्षांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.