अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करा -- मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी     |      श्रीरामनवमी निमित्ताने संगमनेरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची भव्य दिव्य शोभायात्रा     |     
दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचा प्रशासनाचा निर्णय  ? By Admin 2025-03-12

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेर बसस्थानकाचा संपूर्ण परिसर 'संवेदनशील क्षेत्र' म्हणून जाहीर

संगमनेर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीची जय्यत तयारी सुरु असतानाच संगमनेरात मात्र त्याला नाराजीची किनार लागली आहे. तीथीनुसार साजऱ्या होणाऱ्या या उत्सवासाठी शिवसेनेच्यावतीने किल्ला उभारण्यासाठी तर, काँग्रेसप्रणित शिवजन्मोत्सव सोहळा समितीने 'शिवमंदिर' उभारण्यासाठी बसस्थानकावरील जागेची मागणी करण्यात आली होती. एकाच जागेसाठी दोन्ही बाजूने दावे करण्यात आल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. त्यातून मध्यममार्ग काढण्याचे प्रयत्नही फोल ठरल्यानंतर प्रशासनाने आता दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतल्याचे विश्वसनीय वृत्त असून बसस्थानकाचा संपूर्ण परिसर 'संवेदनशील क्षेत्र' म्हणून जाहीर करण्यात आला आहे. प्रांताधिकारी तथा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या परिसरात कोणतेही सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अथवा राजकीय कार्यक्रम किंवा आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयानंतर काँग्रेस प्रणित समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आंदोलनाच्या पवित्र्यात आल्याने संगमनेरातील शिवजयंतीचा वाद उफाळण्याची शक्यता आहे.राज्यात तारखेनुसार आणि तीथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाल्यापासूनच तीथीनुसारच्या उत्सवावर शिवसेनेचा पगडा राहीला आहे. यावेळी मात्र राज्यासह संगमनेरातही मोठे राजकीय उलटफेर घडल्याने तालुक्यात नवा राजकीय संघर्ष उभा राहु लागला आहे. आमदार सत्यजीत तांबे तालुक्याच्या राजकारणात अधिक सक्रिय झाले असून त्यातूनच काँग्रेसने यावेळी पहिल्यांदाच शिवजयंती उत्सव (तीथीनुसार) साजरा करण्याचा निर्णय घेवून त्यासाठी बसस्थानक परिसरातील जागेची मागणी केली होती.
मात्र त्याचवेळी तीथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची परंपरा समोर करुन शिवसेनेही बसस्थानकाच्या जागेवर किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यासाठी अर्ज दाखल केल्याने यंदाच्या शिवजन्मोत्सवाला वादाची किनार लागण्याची चिन्हे दिसू लागली होती. त्याचा प्रत्यय आता येवू लागला असून प्रशासनासोबत तीनवेळा बैठका होवूनही बसस्थानकाच्या जागेबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने काँग्रेस प्रणित शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातून या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता.11) सायंकाळी प्रांताधिकारी कार्यालयात जवळपास तीनतास ठिय्या दिला होता.यावेळी वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रात्री उशिराने काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करुन बसस्थानकावरील जागेचा निर्णय मंत्रालय पातळीवर पोहोचल्याने बुधवारी सकाळी कार्यालय सुरु झाल्यानंतरच परवानगीबाबत काही सांगता येणं शक्य असल्याचे सांगत तो पर्यंत वाट पाहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे आज (ता.12) याबाबत काही ठोस निर्णय समोर येण्याची अपेक्षा असताना स्थानिक प्रशासनाने 'वादग्रस्त' ठरत असलेला संगमनेर बसस्थानकाचा परिसर 'संवेदनशील क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात आता सत्ताधारी अथवा विरोधक अशा कोणालाही कोणत्याही स्वरुपाचा देखावा सादर करण्यास मनाई असणार आहे.प्रशासनाच्या या निर्णयानंतर संगमनेरातील विरोधकांसह काँग्रेस प्रणित शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी कोणत्याही स्थितीत बसस्थानकावर 'शिवमंदिरा'ची प्रतिकृती उभारण्याचा निर्धार केल्याने वातावरण गंभीर बनले आहे. मात्र प्रशासनानेही संभाव्य विरोध लक्षात घेवून तत्पूर्वीच बसस्थानकाच्या जागेचा ताबा घेतला असून बंदोबस्तातही मोठी वाढ केली आहे. त्यामुळे यावेळचा संगमनेरातील शिवजयंती उत्सव चर्चेत आला आहे.
परवानगी नाकारल्याची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस प्रणित शिवजन्मोत्सव समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी थेट बसस्थानकाजवळील 'संवेदनशील' घोषित झालेल्या जागेवर धाव घेतली. त्याचवेळी महायुतीचे कार्यकर्तेही तेथे आल्याने दोन्ही बाजूने सुरुवातीला तुफान घोषणाबाजी झाली तर त्यानंती दोन्ही बाजूने आक्रमक झालेले काही कार्यकर्ते थेट एकमेकांवर धावून गेले. मात्र या परिसरातील यापूर्वीच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात असल्याने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.