दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेरात नामांकित डॉक्टर अमोल कर्पेवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार व पोक्सोअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल
संगमनेर- प्रतिनिधी
शहरातील नामांकित डॉक्टर अमोल कर्पे यांनी एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दवाखान्याच्या टेरेसवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दरम्यान फरार झालेल्या डॉक्टरला पोलिसांनी नाशिकमधून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. शहरात राम नवमी उत्सवाची धामधुम सुरू असतानाच समोर आलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून डॉ. कर्पेवर शहर पोलीस ठाण्यात बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रुग्णालयात चौकशीसाठी गेलेल्या महिला पोलीस पोलीस अधिकाऱ्याला दवाखान्यातील महिला कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार देखील घडला असल्याची माहिती समोर येत आहे.संगमनेर शहरातील कर्पे याच्या दवाखान्यात संगमनेर तालुक्याचा ग्रामीण भागातील अल्पवयीन पीडित मुलगी रुग्ण म्हणून चार एप्रिल पासून उपचार घेत होती. रविवारी पहाटे चार-पाच वाजण्याच्या सुमारास दवाखान्यात आलेल्या डॉ. कर्पे याने पीडित रुग्ण मुलीच्या तब्येतीची विचारपूस करत 'तू जरा बाहेर ये, असे सांगत तिला टेरेसवर घेऊन गेले'. त्यानंतर बोलता बोलता तिला मिठी मारत कपड्यात हात घातले. पीडित मुलगी ओरडली असता 'ओरडू नको नाहीतर तू काय केले हे मी तुझ्या आई-वडिलांना सांगेल, असे सांगून तू जर कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार केला'. व पुन्हा धमकी देऊन निघून गेले.
सकाळी नऊच्या सुमारास दवाखान्यात आलेला आपल्या चुलत्याला तीने आपल्यावर अत्याचार झाल्याची माहिती दिली, त्यानंतर चुलत्याने नातेवाईकांना या घटनेची माहिती दिल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरच्या दवाखान्यासमोर येऊन हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकाराचा बोभाटा झाल्याने डॉ. कर्पे फरार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. त्याचबरोबर, घटनेची माहिती हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनीही दवाखान्यासमोर धाव घेतली. कार्यकर्त्यांनी दवाखान्यात घडलेल्या या घटनेचा तीव्र निषेध करत संबंधित डॉक्टरविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.या घटनेची माहिती शहरात आणि परिसरात वेगाने पसरल्याने दवाखान्यासमोर बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. तर पीडित मुलीच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात डॉ. अमोल कर्पे याच्या विरोधात रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. पुढील तपास संगमनेरचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फरहाना पटेल करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात चौकशीसाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यास रुग्णालयातील महिलेले धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला असून यासंदर्भात देखील धक्काबुक्की करणाऱ्या दवाखान्यातील महिलेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.