दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेर तालुक्यात मागील दोन - तीन दिवसापासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. आज संगमनेर शहरासह पश्चिम व पूर्व भागामध्ये जोरदार पाऊस झाला असून यामुळे कांदा भाजीपाला यांसह साठवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली आहे याचबरोबर काही जनावरे दगावली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावे अशा सूचना महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी महसूल व कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत.
आज निमगाव भोजपूर,निमज, चंदनापुरी, वेल्हाळे, सांगवी, पेमगिरी नांदुरी, राजापूर,चिकणी,या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. या भागामध्ये डाळिंब पीक मोठ्या प्रमाणात असून या अवकाळी पावसाने डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाले याचबरोबर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांदा हा शेतीमध्ये डेपो बनवून साठवला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी साठवलेले कांद्याचे डेपो पूर्णपणे वाया गेले आहे. याचबरोबर कोबी, फ्लॉवर यांच्या लागवडी मोठ्या प्रमाणात झाले असून, वालवड सह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे .तर काही गावांमध्ये घरांची पडजड झाली आहे. काही ठिकाणी जनावरे दगावली आहे.