दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
आमदार सत्यजित तांबे यांनी शिक्षण विभागाच्या कारभारावर ओढले ताशेरे
संगमनेर ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहे. उत्तम प्रशासक, लोकशाही राज्यपद्धती, आदर्श संस्कार देणारे महाराज असे सर्वगुणसंपन्न छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा देशातील सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण कळायला पाहिजे. याकरता महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने व सरकारने ठोस पावले उचलले गरजेचे आहे. मात्र वारंवार मागणी करूनही सरकार याबाबत उदासीन आहे. हे दुर्दैवाचे असून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएससी पॅटर्न मध्ये फक्त 68 शब्दांचा आहे. हे राज्यातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत खेदजनक असल्याचे मत आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सीबीएससी पॅटर्न मध्ये अवघ्या 68 शब्दांमध्ये असलेल्या इतिहासावर नाराजी व्यक्त करताना आमदार तांबे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. त्यांची राजनीति,युद्ध कौशल्य, साहस, लोकशाही राजनीती, स्त्रियांचा आदर, आदर्श संस्कार असे सर्व पैलू हे देशातील सर्व विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे. याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सीबीएससी पॅटर्नमध्ये विस्तीर्ण असला पाहिजे मात्र तो सध्या इयत्ता पहिली ते दहावी अवघ्या 68 शब्दांचा आहे हे महाराष्ट्रातील आणि देशातील प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे.
याबाबत आपण मागील अधिवेशनामध्ये सुद्धा मागणी केली होती मात्र शालेय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत पूर्णपणे उदासीन आहे. शिक्षण विभागाला शिक्षण सोडून इतर कामांमध्ये मध्ये रस आहे असे दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड समाजातील सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. महाराजांनी ऐश्वर्य नाही तर जनतेचे राज्य निर्माण केले त्यांचा इतिहास अवघ्या 68 शब्दांमध्ये आणि देशातील अनेक महाराजांचा ज्यांनी मोठ - मोठे महाल बांधले त्यांचा इतिहास मात्र सविस्तर आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षांपूर्वी बांधलेले गड किल्ले आजही सुरक्षित आहेत मात्र राज्य सरकारने तीस वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती आणि रस्ते त्यांची काय अवस्था आहे सर्व जनतेला माहिती आहे. कोणतीही अडचण निर्माण झाली तर ती सोडवण्याची ताकद शिवचरित्रामध्ये आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात झाले पाहिजे. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक करण्याबाबत काय झाले तो प्रश्न अनुत्तरीत आहेत याचबरोबर गड किल्ले संवर्धनासाठी दरवर्षी मोठा दिली जातो त्याचे काय होते हाही प्रश्न आहे.
2006 - 07 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठांमध्ये मराठी भाषा अध्यासन केंद्राकरिता एक कोटी रुपयांचा निधी दिला होता खरे तर महाराष्ट्र पर्यटन महाराष्ट्र संस्कृती महाराजाचा इतिहास हा संपूर्ण जगामध्ये गेला पाहिजे याकरता राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली. यावर राज्यमंत्री शिक्षण डॉ.पंकज भोईर यांनी उत्तर दिली असून महाराष्ट्रातील शिष्टमंडळ केंद्रीय शिक्षण मंत्री यांना भेटून महाराजांचा इतिहास हा सीबीएससी पॅटर्न मध्ये असावा ही मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.