दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
महसुली मंडळाची फेररचना हा महसूल खात्याचा धोरणात्मक विषय
संगमनेर ( प्रतिनिधी ) आश्वी बुद्रुक अप्पर तहसील कार्यालयावरून संगमनेर मध्ये वातावरण तापलेले आहे, जनतेचा राग बघितल्यानंतर पालकमंत्री आणि आमदार महोदय महसुली मंडळांच्या फेररचनेची खोटी माहिती जनतेला देत आहेत. महसुली मंडळाची फेररचना हा राज्याच्या महसूल विभागाचा धोरणात्मक निर्णय असतो, संगमनेर बाबतीत असा कोणताही निर्णय महसूल विभागाने अद्याप पर्यंत घेतलेला नाही. असा काही निर्णय झाला असेल तर राज्याच्या महसूल विभागाचा तसा आदेश कागदपत्रासह जनतेला दाखवा असे असे थेट आव्हानच अखंड संगमनेर कृती समितीचे अध्यक्ष भाऊराव रहाणे यांनी दिले आहे.
संगमनेर तालुक्यातील जनता गेल्या वीस दिवसांपासून विविध माध्यमातून संगमनेर तालुक्याच्या प्रशासकीय विभाजना विरोधात लढा देत आहे. अन्यायकारक आश्वी बुद्रुक अप्पर तहसील निर्मितीच्या विरोधात संगमनेर तालुक्यात चाळीसहून अधिक गावांनी ग्रामसभा आणि निषेधसभा घेतलेल्या आहेत. जनतेच्या लढ्याची धार बोथट करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सुद्धा खोटे बोलत आहेत, संगमनेर तालुक्यातील महसुली मंडळांच्या फेररचनेचे कोणतेही आदेश अद्याप महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना किंवा तहसीलदारांना दिलेले नाही. त्यामुळे खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा पालकमंत्री आणि आमदारांनी संगमनेर तोडण्याचा जो डाव आखला गेला आहे, त्याबद्दल जनतेची पहिल्यांदा जाहीर माफी मागावी. कोणत्याही सबबीवर संगमनेर तोडण्याचा डाव जनता यशस्वी होऊ देणार नाही, असेही भाऊराव रहाणे यांनी सांगितले.