दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेरच्या पाणी योजनेचे कोपरगाव कौतुक
संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेरमध्ये दररोज पाणी येते, जे संगमनेरला जमले ते कोपरगावला का नाही? ” असा प्रश्न उपस्थित करणारे फलक कोपरगाव शहरात लागले आहे, त्यामुळे संगमनेरच्या पाणी योजनेची चर्चा पुन्हा जोर धरू लागली. अहमदनगर जिल्ह्यात दररोज दोन वेळा पूर्ण दाबाने पाणी मिळणारे संगमनेर हे एकमेव शहर आहे.
शहरीकरणात पाण्याची उपलब्धता हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पाण्याची टंचाई जाणवते; रात्री-अपरात्री पाणी येते किंवा माती मिश्रित, अस्वच्छ पाणी पुरवले जाते. मात्र संगमनेर स्वयंपूर्ण आहे. पावसाळ्यातही अनेक शहरांना पाणीटंचाई भासते, पण संगमनेरमध्ये उन्हाळ्यातही दररोज दोन वेळा पूर्ण दाबाने पाणी येते. त्यामुळे संगमनेरची पाणी योजना कौतुकाचा विषय ठरली आहे. कोपरगावातील फलकांमुळे या योजनेची पुन्हा उजळणी झाली.
सन १९९९ मध्ये निळवंडे धरणाच्या कामाला गती मिळाली. तेव्हाच संगमनेर शहरासाठी थेट पाईपलाइन आणली गेली. शिवकालीन पाणी योजनांच्या धर्तीवर गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने निळवंडे धरणातून पाईपलाइनद्वारे पाणी शहरात आणले गेले. ही कल्पना तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री बाळासाहेब थोरात यांची होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी थोरातांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. या संबंधांचा उपयोग करून थोरात यांनी पाईपलाइनला प्रशासकीय मंजुरी मिळवली आणि काम सुरू केले. या योजनेमुळे संगमनेर शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला. आज संगमनेर शहरात दिवसातून दोन वेळा पाणी येते.
कशी आहे योजना?
निळवंडे धरणाच्या भिंतीच्या तळाशी संगमनेरसाठी स्वतंत्र व्हॉल्व्ह बसवला आहे. निळवंडे ते अकोले अशी ३८ किलोमीटर लांबीची ही पाईपलाइन आहे. उताराच्या साहाय्याने पाणी थेट संगमनेरमध्ये पोहोचते.