दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
बसस्थानकातून गळ्यातील दोन तोळे मंगळसूत्र लांबवले
संगमनेर बसस्थानकावर एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मनीमंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. ही घटना गुरुवारी घडली.
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील एक महिला महाशिवरात्री निमित्ताने बुधवारी अकोले येथे आपल्या नातेवाईकांकडे गेली होती. गुरुवारी ती गावी जाण्यासाठी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अकोल्याहून संगमनेरला परत आली होती. संगमनेर बस स्थानकावर ती बसची वाट पाहत असताना साडेतीन वाजण्याच्या सुमारास पेमगिरीला जाण्यासाठी फलाटावर बस लागली होती. बसमध्ये चढण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि लोकांची गर्दी होती. गर्दीत महिला कशीबशी बसमध्ये चढली आणि सीटवर बसल्यानंतर गळ्यातील मनी मंगळसूत्रामधील काही मनी सीटवर पडल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे महिलेने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र बघितले असता गळ्यात मंगळसूत्र नव्हते. अज्ञात कोणीतरी चोरट्यांनी गळ्यातील मंगळसूत्र तोडून चोरून नेल्याचे महिलेच्या लक्षात आले. तीने आरडाओरड केली शोध घेतला असता चोरटा पसार झाला. महिलेने संगमनेर शहर पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली.