दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्याच्या वेस्टेजमुळे दुर्गंधी; नागरिकांमध्ये संताप
संगमनेर: शहरातील अवैध कत्तलखान्यातून निर्माण होणारा कचरा, आतडे, कातडे व हाडे सेंट मेरी स्कूल, फादरवाडीच्या पाठीमागे सुभाष गुलाब मेहेत्रे यांच्या शेतात टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून रोगराई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या कचऱ्यामुळे परिसरातील पाणी दूषित होत असून विहिरींच्या पाण्यालाही दुर्गंधी आली आहे. तसेच, या भागात हिंस्र प्राण्यांचा वावर वाढला आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, बजरंग दल आणि स्थानिक नागरिकांनी संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, या कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावावी आणि पशुसंवर्धन कायद्याअंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
पाच दिवसांत कारवाई न झाल्यास स्थानिक नागरिक व विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विहिंपचे प्रशांत बेल्हेकर, विशाल वाकचौरे, कुलदीप ठाकूर, सुरेश कालडा, ओंकार भालेराव, किशोर गुप्ता, आदित्य गुप्ता, साई गुप्ता, अनिकेत पवार, किरण पाचारणे, हर्ष खोल्लम, शामल बेल्हेकर, ॲड. सोनाली बोटवे, मधुरा पोळ आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.