संगमनेर ( प्रतिनिधी )
धांदरफळ बु. येथे नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या ६० वर्षीय महिलेचा विद्युत तारेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार दि १८ ऑगस्ट रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. या हृदय द्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या दुर्दैवी घटनेत ललिता सुनील थेटे (रा. भगवतीपूर, प्रवरानगर) या दशक्रिया विधीच्या मदतीसाठी तीन चार दिवसांपासून धांदरफळ येथे नातेवाईकांकडे आल्या होत्या. एका दुःखद प्रसंगासाठी आलेल्या नातेवाईकांना दुःखद प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळी आली. या आघाताने परिसरात शोककळा पसरली.
बुधवार दि १९ ला तोरकडी यांच्या दशक्रिया विधीच्या आदल्या दिवशी नातेवाईक व पाहुणे मंडळी आली होती. ललिता थेटे यांनी दिवसभराच्या कामाला हातभार लावला, कामे आटोपल्यानंतर रात्री सर्वजण एकत्र बसले असताना थिटे या घराशेजारील कांद्याच्या चाळीचा लोखंडी दरवाजा लावण्यासाठी गेल्या. कुत्रे मांजरी आत जाऊ नयेत म्हणून दरवाजा लावत असतानाच बाजूला असलेली विद्युत तार लोखंडी कुंपणाच्या संपर्कात आल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्याच ठिकाणी ओलावा असल्याने विद्युत तारेचा तीव्र प्रवाहाचा झटका बसला. काही मिनिटातच त्या गतप्राण झाल्या. काही फुटाच्या अंतरावर ही घटना घडल्याने नातेवाईकांनी धाव तिकडे घेतली. परंतु सदर महिला बेशुद्ध झाल्याचे लक्षात येताच, साप वगैरे चावला की काय ? असा संशय बळावला. परंतु प्रसंगावधान राखत मदतीसाठी धावलेल्या नातेवाईकांनी लाकडाच्या सहाय्याने त्यांना विद्युत प्रवाहापासून बाजूला केले, मात्र अवघ्या काही मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर थेटे यांना तातडीने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तोरकडी यांच्या दशक्रिया विधीच्या दुःखद प्रसंगातच ललिता थेटे यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंब आणि नातेवाईकांवर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला असून धांदरफळसह प्रवरानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

