संगमनेर: पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने

 

केलेल्या कारवाईत १५२ किलो गांजा जप्त करण्यात आला. या कारवाई पोलिसांनी सुमारे ८९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन गांजा तस्करांना अटक करण्यात आली आहे, तर मुख्य सूत्रधारासह त्याचे तीन साथीदार पसार झाले आहेत. या तस्करीतील सर्व आरोपी पुणे जिल्ह्यातील आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर शहराजवळील सायखिंडी फाटा येथे पोलिसांनी ही कारवाई केली.

आसाम, ओरिसा राज्यातून मिळवलेला उच्च प्रतीचा गांजा काही वाहनांतून पुण्याच्या दिशेला नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संगमनेर तालुक्यातील सायखिंडी फाटा येथे काल, सोमवारी सकाळी रचलेल्या सापळ्यात १५२ किलो ६१ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत वाहनासह एकूण ८८ लाख ७७ हजार ४७० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून दोन तस्करांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तीन साथीदार अद्याप फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास

 

जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

कारवाईत अटक करण्यात आलेले आरोपी दत्तात्रय नानाभाऊ इचके (वय रा. कवठे यमाई, ता. शिरूर, 

 

पुणे) आणि श्रीहरी बाळू मिडगुले (रा. कान्हूर यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी हा मुद्देमाल आसाम येथून कुंग्फू नामक व्यक्तीकडून आणल्याची कबुली दिली. हा साठा साहेबराव उर्फ भाऊसाहेब बाळू मिडगुले (रा. कान्हूर यमाई) आणि विशाल उर्फ दादा साळुंके (रा. पुणे) यांच्याकडे सुपूर्द केला जाणार होता आणि तेथून संपूर्ण पुणे जिल्ह्यात विक्री केली जाणार होती, असे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे. सुरवातीला संशयितांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा आणि उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मोटारीची कसून झडती घेतली असता, आतमध्ये प्लॅस्टिकच्या अकरा सीलबंद गोण्या आढळून आल्या. पंचांसमक्ष गोण्या उघडून पाहिल्यावर त्यातून गांजा या वनस्पतीचे शेंडे, पाने आणि बिया असलेला उग्र वासाचा उच्च प्रतीचा गांजा मिळून आला. तस्करांनी पोलिसांची नजर चुकवण्यासाठी गाडीवर बनावट नंबर प्लेट लावून प्रवास सुरू ठेवला होता.

इतर आरोपी आरोपी कुंग्फू, साहेबराव मिडगुले आणि विशाल साळुंके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. उपनिरीक्षक विकास जाधव यांच्यासह अंमलदार विजय पवार, रिचर्ड गायकवाड, विकास साळवे, राहुल डोके, भीमराज खरसे, भगवान थोरात, सुनील मालनकर आणि महादेव भांड यांचा कारवाई केलेल्या पोलीस पथकात समावेश् होता.