संगमनेर तालुक्यात दुष्काळामुळे पाणीटंचाई कायम आहे. आढाव बैठकीतही याप्रश्नी चर्चा झडली. सध्या तालुक्यातील ८ गावांसह १६ वाड्यांना ७ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रविण सिनारे यांनी दिली.

 

संगमनेर तालुक्यात यंदा एप्रिल महिन्यात टँकर्सने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. जुलैअखेर टँकर्स कमी झाले, मात्र पावसाने पाठ फिरविल्याने पाणीटंचाई कायम राहिली. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याने टँकर सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली. तालुक्यात पाणीटंचाई बरोबरचं चारा टंचाई व जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा

 

प्रश्नही गंभीर होत आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया गेल्या. पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.

 

विशेषतः पठार भागासह तळेगाव,

 

निमोण परिसरातील गावे व वाडी, वस्त्यांवर दुष्काळाच्या झळा अधिक जाणवत आहेत, मात्र टंचाईने आता सर्व तालुक्यात दुष्काळाच्या झळा बसल्याने टँकसरची मागणी वाढणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरचं जनावरांना चारा महत्त्वाचा असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

 

टँकर्सची संख्या वाढणार

 

सध्या संगमनेर तालुक्यात हिवरगाव पठार, बिरेवाडी, कौठे मलकापूर, वरंवडी, कुभारवाडी, खांबे, खरशिंदे, जांभुळवाडी या गावांसह आसपासच्या वाडीवस्त्यांवर टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाने पाठ फिरविल्याने येत्या काही दिवसात टँकर्सची संख्या वाढणार आहे.