संगमनेर व राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधित तबाखूच्या

विक्रीसाठी प्रत्येक तालुक्यात होलसेल डीलर, ट्रान्सपोर्टर, किरकोळ विक्रेत्यांची साखळी कार्यरत आहे. दरम्यान, गुटखा विक्रीबाबत अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संबंधित खात्याच्या ईमेलवर तक्रार नोंदवा, असे उत्तर देण्यात आले. खुलेआम गुटखा विक्रीकडे मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अहिल्यानगर शहर गुटखा साठ्याचे प्रमुख केंद्र बनले आहे. येथून रात्री उशीरा खासगी वाहनांतून संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले,

नेवासे, राहाता, शिर्डी, शेवगावसह इतर ताक्यांमध्ये गुटखा पाठविला जातो. प्रत्येक तालुक्यात चार-पाच प्रमुख होलसेल विक्रेते आहेत. त्यांच्या गोडाऊनमध्ये गुटखा उतरवला जातो. तेथून तो टपऱ्या, शाळा-कॉलेज परिसरातील किरकोळ विक्रेत्यापर्यंत पोहोचवला जातो. होलसेल डीलरकडून दरमहा कोट्यावधी रुपयांचा माल जिल्हाभरात पुरविला जातो. किरकोळ विक्रेते वेगवेगळ्या किमतींना गुटक्याचे पाकिटे विकतात. अन्न व औषधे प्रशासन विभाग तसेच पोलीस प्रशासनाचेही गुटख्याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामध्ये मोठे आर्थिक रॅकेट असल्याने कारवाई होत नाही. किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून मोहीम सुरू असल्याचे दाखविले जात आहे.

कारवाईच्या सुचना द्या

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत आहे. महिन्याला पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल गुटखा विक्रीतून होत असल्याची माहिती आहे. आयुक्त मुंढे यांनी गुटखा विक्री गंभिरतेने घेऊन कारवाईच्या सूचना द्याव्यात.

ई-मेलवर तक्रार नोंदवा

गुटखा विक्रीबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून तक्रार केली असता या खात्याच्या ई मेलवर तक्रार नोंदवली तरच कारवाई करता येईल, असे सांगितले. डोळ्यासमोर विक्री दिसत असताना संबंधितांवर कारवाई का होतं नाही, असा सवाल नागरिक विचारत आहे.