दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
चॉपरने वार करून ३५ हजारांचा ऐवज लुटला; ४ जणांविरुद्ध गुन्हा
संगमनेर : दुचाकीवरून जाणाऱ्या तिघा जणांना अडवून त्यांच्यातील दोघांवर चॉपरने वार करून त्यांच्याकडील ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये रोख, असा ३५ हजार रुपयांचा ऐवज लुटले. काल सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरातील अकोले नाका परिसरात ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली
माहिती अशी की, काल सोमवारी (दि. ७) दुपारी दोन वाजेच्या सुमारास राजापूर येथील बाबासाहेब हासे हे आपले वडील व भावासह धान्याचा नमुना दाखविण्यासाठी संगमनेर येथे दुचाकीवरून आले होते. काम आटोपल्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरून घरी जात असतांना अकोले नाका येथे एका बारच्या समोर समोरुन चारजण त्यांना आडवे झाले. त्यातील राहुल सोनवणे याच्या हातात चॉपर होता. तर इतर तिघा जणांच्या हातात लाकडी काठ्या होत्या. तेव्हा राहुल सोनवणे याने त्याच्या हातातील चॉपरने हासे यांच्या वडिलांच्या उजव्या डोळ्याच्या खाली वार करून जखमी करुन त्यांच्या खिशातील पाच हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली. तेव्हा हासे यांचा भाऊ विरोध करीत असतांना त्याच्याही उजव्या डोळ्याच्या खाली राहुल सोनवणे याने चॉपरने वार करुन जखमी केले. इतर तिघांनी त्यांच्या हातातील काठ्यांनी आम्हा तिघांना हाता पायावर व डोक्यावर मारहाण करुन जखमी केले. किरण हासे याच्या गळ्यातील दिड तोळा वजनाची सोन्याची चैन इतर एकाने बळजबरीने हिसकावुन घेतली. या तिघांना मारहाण होत असतांना नितीन गोविंद हासे (रा. राजापूर), यादव अशोक खाडे (रा कासारवाडी), श्रीराम शरद कासार (रा. निमगाव) हे मोटार सायकलवरून जात असतांना त्यांनी मारहाण पाहुन मारहाण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही राहुल सोनवणे व इतरांनी काठीने मारहाण करुन दुखापत करून सोन्याची चैन व रोख रक्कम जबरीने हिसकावुन पळून गेले. या ठिकाणी जमलेल्या नागरीकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. याबाबत बाबासाहेब हासे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी राहुल भारत सोनवणे, आदित्य संपत सुर्यवंशी, साई शरद सुर्यवंशी, अमोल सोनवणे (सर्व, रा. अकोले नाका, संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.