दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
जेजुरी गडावर संगमनेर येथील होलम राजाच्या काठीसह जेजुरी गडावर मानाच्या शिखर काठ्यांचा देवभेट सोहळा जल्लोषात
जेजुरी: खंडोबा देवाच्या माघी पौर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या होलम, होळकर, खैरे आणि प्रासादिक शिखर काठ्यांचा देवभेटीचा सोहळा जेजुरी गडावर जल्लोषात पार पडला. या वेळी हजारो भाविकांनी भंडार्याची उधळण करून 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष केला.मानाच्या व गावोगावच्या शिखर काठ्या माघी पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी जेजुरी गडावर नेऊन त्या खंडोबा मंदिराला टेकवून देवभेट घेण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. संगमनेर येथील होलम राजा, सुपे येथील खैरे आणि होळकर यांच्या मानाच्या शिखर काठ्या दरवर्षी जेजुरी गडावर येऊन देवभेटीचा सोहळा साजरा करतात.
माघी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी (दि. 13) सकाळी संगमनेर होलम राजाची शिखर काठी चिंचेची बाग, ऐतिहासिक गौतमेश्वर मंदिर, मारुती मंदिरमार्गे गडावर वाजतगाजत आणण्यात आली. सकाळी 11 वाजता होलम राजाच्या शिखर काठीचा देवभेट सोहळा पार पडला. या वेळी हजारो भाविकांनी भंडार्याची उधळण करून जल्लोष केला.